महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतोने बारावीची परीक्षा 18 तारखेपासून सुरू झाली आहे. तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून घेण्यात येणार आहे. यंदा मात्र विद्यार्थी संख्या वाढलेली असल्याने परीक्षेच्या वेळी एवढे विद्यार्थी आले कुठून? असा प्रश्न बोर्डाकडून उपस्थित केला जात होता. यावर्षी दहावी परीक्षेला 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मागील वर्षी विद्यार्थी संख्या अत्यंत कमी होती. यावर्षी अचानक विद्यार्थी संख्या वाढल्याने बोर्डही संभ्रमात पडले आहे. एकतर 25 विद्यार्थ्यांचा एक भाग असे नियोजन करताना बोर्डाला चांगलीच कसरत करावी लागली आहे. विभागातून 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थीदहावी परीक्षेला औरंगाबाद जिल्ह्यातुन 69 हजार 706 विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थ्यांची 222 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील 156 केंद्रावर 46 हजार 536 विद्यार्थी तर जालना जिल्यातून 100 परीक्षा केंद्रावर 35 हजार 101 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच परभणीतुन 31 हजार 956 विद्यार्थ्यांसाठी 93 तर हिंगोली जिल्ह्यातुन 18 हजार 273 विद्यार्थ्यांचे 53 परीक्षा केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे. असे एकूण विभागातून 624 परीक्षा केंद्रावर 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये मुलींची संख्या 86 हजार 567 तर मुलांची संख्या 1 लाख 15 हजार 5 एवढी आहे. परीक्षेला सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘त्या’ पंधरा शाळेतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम
औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातुन 624 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेला विभागातून एकूण 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. मात्र काही शाळांतील विद्यार्थ्यांनी अद्यापही दहावी परीक्षेला अर्ज भरलेले नाहीत. विभागातील अशा पंधरा शाळा आढळून आल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी नेमके गेले कुठे? असा प्रश्न बोर्डाला पडला आहे. एकही विद्यार्थी परीक्षेला बसले का नाही? असा प्रश्न ही बोर्डाच्या वतीने पंधरा शाळांना उपस्थित केला आहे. याशिवाय बोर्डाच्या वतीने या शाळांना कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या आहेत. या शाळातील विद्यार्थी जर परीक्षेला बसलेच नाही तर या शाळांची बोर्ड मान्यता रद्द करणार आहेत. उद्यापासून सुरू होणार्या दहावी परीक्षेला अद्यापही पंधरा शाळेतील विद्यार्थ्यांचे एकही अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे या शाळांचे नेमके करायचे काय असा प्रश्न बोर्डासमोर आहे.